Wednesday, February 23, 2005

बागेतला माळी (The gardener)

We work hard to achieve our goals. At times, we succeed. At times, our efforts remain unrewarded. But, we should not lose hope and work harder, to make up for today’s failure with a greater success tomorrow. This poem, originally written on Feb 23, 2005, uses the metaphor of a gardener to illustrate this idea.

कधी ग्रीष्माच्या अमावशीलाही मनमोगर्‍याला बहर येतो,
कधी वसंत पौर्णिमेला सुद्धा कल्पगुलाब कोमेजतो,
पाऊलवाटेवरची ती फुलराणी लघुदुःखांवर फुंकर घालते,
फाट्यावरचा काटा मात्र थेट हृदयाला बोचतो.

बागेतला माळी म्हणून आपण राब राब राबतो,
स्वेदस्पर्शाने कळी-कळीत रंग-गंध फुलवतो,
माळ्याच्या परिश्रमांबद्दल प्रत्येक कळी कृतज्ञ असते,
बहरलेली ती बाग साक्षात परमेश्वराची साक्षरी असते.

बागमालकाला आणखी एक मोठी बाग ठेवायची असते,
त्यासाठी सर्वोत्कृष्ट माळ्याची निवड होणार असते,
'त्या' नेमक्या दिवशी चुकून परीक्षकाच्या नयनी पट्टी असते,
गंधाची चव बघणार्‍याला आनासिका सर्दी झालेली असते.

आपल्या बागेच्या उत्तमतेची जाणीव माळ्याला असतेच असते,
मोठ्या बागेत घेऊन जाणार्‍या मनोरथात स्वारी बसलेली असते,
वरून आलेला निर्णय मात्र षष्टेंद्रियाला आव्हान देतो,
बागेतल्या हसर्‍या फुलांचा माळी जागीच उदास बसून राहतो.

दुःखसागरा शुष्क करण्या समयरवी त्वरीत येतो,
आपल्या मनःव्योमात माळी सुखवृष्टीचे ढग तयार करतो,
आजच्या पेरणी-खत-पाण्याची उद्या पुन्हा कसोटी असते,
आज हुकलेली शाबासकी उद्या नक्की मिळवायची असते.

माळ्याच्या मनोधैर्याची खंबीरता सार्‍या जगाला ज्ञात असते,
त्याच्या खेदगंगेचे पाणी कुण्या कवीच्या नयनी असते.